पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ; शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण…
लोकार्थ मीडिया रिपोर्ट चंद्रकांत अंबिलवादे
पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या विहिरीवरील कृषी पंप व केबल वायर चोरीच्या घटनांनी त्रस्त झालेल्या परिसरात आता पशुधन चोरट्यांनीही डोके वर काढले आहे. केकत जळगाव येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तीन बकऱ्या चोरून नेल्याची घटना दि. ५ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे.
केकत जळगाव येथील गोरख एकनाथ बडे यांच्या घरासमोर बांधलेल्या तीन बकऱ्या मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. विशेष म्हणजे चोरीची ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, दोन चोरटे चोरी करताना फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत असल्याचे समजते.
या घटनेप्रकरणी गोरख एकनाथ बडे यांनी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन चोरीस गेलेल्या बकऱ्यांचा तपास करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी पंप, केबल वायर आणि आता पशुधन चोरीच्या घटनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
No Comment! Be the first one.