‘आयुक्तांना फक्त पिंपरी-चिंचवडची क्रिम पोस्ट हवी असेल, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची बदली करावी; शहराला खमक्या अधिकारी द्या!’
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अक्षरशः आगपाखड केली. शहरात दिवसाढवळ्या खून होत आहेत, रस्त्यावर नागरिकांना मारहाण केली जात आहे, खुलेआम ड्रग्स विकले जात आहेत, जुगार अड्डे सुरू आहेत आणि दुसरीकडे पोलीस आयुक्त वसुलीत व्यस्त असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, पोलीस आयुक्तांनी पद सोडावे आणि शहराला खमक्या अधिकारी द्यावा, अशी थेट मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
पत्रकार परिषदेत शिरसाट म्हणाले, माझ्या घरावर हल्ला होतो, शहरात रोज खुनाच्या घटना घडत आहेत. कालही एका हल्ल्यात मृत्यू झाला. रात्री ११ वाजता घटना घडली, मात्र डीसीपी दीड वाजता घटनास्थळी पोहोचतात. पोलीस महासंचालकांनी सांगितल्यानंतर ते आले. पालकमंत्र्यांच्या घराची ही अवस्था असेल, तर सामान्य माणसाने कोणाकडे पाहायचे? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
आयुक्तांना फक्त क्रिम पोस्टची चिंता!
पोलीस आयुक्तांना शहराच्या सुरक्षेपेक्षा पिंपरी-चिंचवडमधील ‘क्रिम पोस्ट’ मिळवण्यात अधिक रस असल्याचा आरोप करत शिरसाट म्हणाले, आयुक्तांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांना ती पोस्ट हवी असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची इच्छा पूर्ण करावी; मात्र छत्रपती संभाजीनगरला सक्षम आणि खमक्या पोलीस अधिकारी द्यावा. आयुक्त गेले पाहिजेत, ही माझी स्पष्ट भूमिका आहे.
ड्रग्स, जुगार अड्ड्यांना कुणाचा आशीर्वाद?
शहरात ड्रग्स आणि जुगाराचे अड्डे खुलेआम सुरू आहेत. हे धंदे कुणाच्या आशीर्वादाशिवाय चालू शकत नाहीत. किती जुगार अड्डे सुरू आहेत, याची माहिती पोलिसांना नसेल; मात्र मला विचारा, मी यादी देतो, असा थेट इशाराच त्यांनी दिला. पोलीस खात्याची बदनामी करणे हा माझा हेतू नाही; पण खात्यामुळे शहराची बदनामी होत असेल, तर मुख्यमंत्र्यांसमोर सर्व प्रकार मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन दिवसांचा अल्टिमेटम; अवैध धंद्यांचा भांडाफोड करणार!
मी पालकमंत्री आहे म्हणून पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करत नाही. पालकमंत्र्यांचा थाट दाखवला तर संघर्ष होईल, त्यामुळे संयम बाळगत आहे. मात्र आणखी दोन दिवस वाट पाहणार. त्यानंतर शहरात कुठे-कुठे अवैध धंदे सुरू आहेत, याचा भांडाफोड करणार, असा इशारा शिरसाट यांनी दिला.
सुरक्षा कुणाची करता? नोकरी की चाकरी?
पोलीस सुरक्षा नेमकी कुणाला दिली जाते, हे बोलायला लावू नका. कुणा-कुणाला सुरक्षा दिली आहे, याची तपासणी झाली पाहिजे. पोलीस नोकरी करतात की चाकरी, हेही पाहावे लागेल, अशा शब्दांत त्यांनी पोलीस यंत्रणेवर निशाणा साधला.
घातपाताला घाबरत नाही; OSD कोण होते, तपासा!
मी घातपात मानत नाही आणि अशा घटनांना घाबरणारही नाही. हल्लेखोरांना पुरून उरणार आहे; मात्र अशा घटनांमुळे इतरांची हिंमत वाढते. हल्लेखोर तीन ओएसडी खिशात असल्याचे सांगत होते. हे ओएसडी नेमके कोण होते, याची चौकशी झाली पाहिजे. माझ्या घरावर झालेला हा तिसरा प्रकार आहे. अनेकदा वाहनांना ओव्हरटेक करणे किंवा मागून गाडी ठोकण्याचे प्रयत्न होतात. यामागे काही कट आहे का, याचीही तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
No Comment! Be the first one.