चितेगावच्या सात ते आठ जणांचे टोळके कंपनीत घुसले; पती-पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण, जीवे मारण्याची धमकी
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : दुचाकीवरून जाताना साईड का दिली नाही, याचा जाब विचारत चितेगाव येथील टोळक्याने सिमेंट प्रॉडक्ट कंपनीच्या मालकाला बेदम मारहाण केल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बाभूळगाव रोडवर घडली. यावेळी एका आरोपीने हातातील कड्याने मालकाच्या गालावर वार करून जखमी केले. पतीला वाचवण्यासाठी धावलेल्या पत्नीला देखील टोळक्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
हरिश्चंद्र मुश्चिंद्र शेळके (वय ३०, रा. पालखेड, ता. वैजापूर, ह.मु. बाभूळगाव, ता. पैठण) असे जखमी कंपनी मालकाचे नाव आहे. त्यांची बाभूळगाव येथे सार्थक इंटरप्रायजेस अँड सिमेंट प्रॉडक्ट कंपनी आहे.
१० नोव्हेंबर रोजी सायंकाळी शेळके दुचाकीवरून कंपनीकडे जात असताना महेश ज्ञानदेव गिधाने आणि राहुल विष्णू नजण (दोघे रा. चितेगाव) हे कारमधून त्यांच्या मागे होते. ते वारंवार हॉर्न वाजवत असल्याने शेळके यांनी कंपनीजवळ दुचाकी थांबवली. यावरून ‘आम्हाला साईड का देत नाही?’ असा जाब विचारत दोघांनी शिवीगाळ सुरू केली.
वाद वाढल्यानंतर आरोपींनी फोन करून आणखी लोकांना बोलावले. काही वेळात संदीप मुरलीधर गिधाने, एक अनोळखी तरुण, महेशची आई आणि अन्य दोन महिलांसह सात ते आठ जण घटनास्थळी आले. यावेळी महेशने हातातील कड्याने शेळके यांच्या गालावर मारले. त्यामुळे त्यांच्या गालातून रक्तस्राव सुरू झाला. इतरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पतीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या संध्या शेळके यांनाही टोळक्याने मारहाण केली.
जखमी शेळके यांनी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बिडकीन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
No Comment! Be the first one.