संगीत कारंजे बंद, रोषणाई गायब; बालगोपालांसह पर्यटकांची निराशा, पाटबंधारे विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
पैठण : मैसूर येथील प्रसिद्ध वृंदावन गार्डनच्या धर्तीवर विकसित करण्यात आलेले पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान दिवाळीच्या सुट्टीत अचानक अंधारात बुडाले. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेनंतर उद्यानातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण उद्यानात अंधार पसरला. संगीत कारंजांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या बालगोपालांसह पर्यटकांचा यामुळे मोठा हिरमोड झाला.
पैठण शहरातील पर्यटनाला चालना मिळावी, पर्यटकांची संख्या वाढावी आणि स्थानिक बाजारपेठेला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे, या उद्देशाने तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे यांनी पुढाकार घेत अनेक वर्षांपासून बंद असलेल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाला नवसंजीवनी देत पर्यटकांसाठी खुले केले होते. उद्यानाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून पर्यटक, शालेय सहलीतील विद्यार्थी आणि लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी विविध सोयी-सुविधा तसेच विकासकामे करण्यात आली होती.
मात्र, या विकासकामांच्या दर्जाबाबत यापूर्वीही पर्यटक आणि नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता ऐन दिवाळीच्या सुट्टीत उद्यान अंधारात बुडाल्याने पुन्हा एकदा उद्यानाच्या व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गुरुवारी संत ज्ञानेश्वर उद्यान नेहमीप्रमाणे सुरू होते. मात्र, सायंकाळी सहा वाजेनंतर अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने उद्यानातील रोषणाई बंद पडली. संगीत कारंजांचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणांहून लहान मुलांसह पर्यटक उद्यानात दाखल झाले होते. मात्र, संपूर्ण उद्यान अंधारात पाहून पर्यटकांना धक्काच बसला. उद्यान बंद आहे का? वीजपुरवठा का खंडित झाला? असे प्रश्न पर्यटकांकडून उपस्थित केले जात होते.
विशेष म्हणजे, उद्यानाच्या प्रवेशद्वारावर उद्यान बंद असल्याबाबत अथवा विद्युत पुरवठा खंडित झाल्याबाबत कोणतीही सूचना लावण्यात आली नव्हती. तसेच उद्यानावर नियंत्रण ठेवणारे पाटबंधारे विभागाचे कर्मचारीही यावेळी उपस्थित नसल्याने पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण शुक्रवारी स्पष्ट होणार!
दरम्यान, संत ज्ञानेश्वर उद्यान अचानक अंधारात का गेले, यासंदर्भात लोकार्थ प्रतिनिधिशी पाटबंधारे विभागाचे सोनकांबळे यांनी सांगितले की, महावितरण विभागाच्या पथकाने रात्री उद्यान परिसरात येऊन पाहणी केली आहे. वीजपुरवठा नेमका कोणत्या कारणामुळे खंडित झाला, याची माहिती शुक्रवारी स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांची मोठी गर्दी अपेक्षित असताना उद्यानातील वीजपुरवठा आणि व्यवस्थापनाचा अभाव यामुळे संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
No Comment! Be the first one.