लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर येथील रोहित पठारे या दलित युवकाच्या हत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून, चार दिवसांपासून केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्या पोलिसांवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल माजी गृहराज्यमंत्री तथा काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी केला. गुरुवारी वैजापूर येथे जाऊन त्यांनी रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडसूळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले.
रोहित पठारे हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, गुन्ह्याचा तपास वेगाने पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करावे आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी राऊत यांनी केली. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर, अगदी फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारने दाखवलेले गांभीर्य रोहित पठारे हत्या प्रकरणात दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. वैजापूर परिसरात अवैध धंदे सुरू असतानाही त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. हत्या प्रकरणात पोलिसांची जबाबदारी निश्चित करून दोषी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
न्याय मिळाला नाही तर राज्यभर आंदोलन
रोहित पठारे हत्या प्रकरणात योग्य न्याय मिळाला नाही, तर राज्यभरातील दलित आणि आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आमदार नितीन राऊत यांनी दिला.

No Comment! Be the first one.