दुष्काळात रब्बी हंगामासाठी कालव्यांद्वारे पाणी वितरण सुरू
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी,
उन्हाळ्यात संभाव्य चारा आणि पाणीटंचाई लक्षात घेता राज्य शासनाने रब्बी हंगामातील पशुचारा आणि पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करण्यासाठी जायकवाडी धरणातून रब्बी हंगामाकरिता कालव्यांद्वारे पाणी वितरण सुरू केले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतीला डाव्या कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.
नाथसागर जलाशयातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे उजवा व डाव्या कालव्याच्या माध्यमातून नियोजित वितरण होत आहे. या पाण्याच्या आवर्तनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे आधार मिळाला आहे. डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात आलेला विसर्ग परभणी जिल्ह्यात पोहचला असून, जिल्ह्यातील रब्बी हंगामाला सिंचनाचे बळ मिळाले असल्याने शेतकरी रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याकामी गुंतला आहे. अल निनोमुळे उद्भवलेल्या संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रथम प्राधान्याने अन्नधान्य व चारा पिकांची लागवड करून घ्यावे. जायकवाडी प्रकल्पांतर्गत सर्व लाभधारकांनी पाणी वापराबाबत आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन नुकतेच जलसंपदा विभागाने केले आहे.
जायकवाडी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगामात तीन पाणीपाळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, इतर अन्नधान्य तसेच चारा पिकांसाठी 15 ऑक्टोबर 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत कालव्याद्वारे तसेच मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाने नुकतेच शेतक-यांकडून पाण्याची मागणी करणारे अर्ज मागवले आहेत.
जायकवाडीच्या कालव्यांमधून सुरू झालेले पाणी वितरण रब्बी पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
No Comment! Be the first one.