लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण पोलीस दलाने फरार आणि पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत 90 आरोपींचा शोध घेण्यात यश आले आहे. यामध्ये 85 आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य 5 आरोपी मयत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या देखरेखीखाली 1 ऑक्टोबर 2026 पासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी ग्रामीण पोलिसांनी एकूण 22 विशेष पथके स्थापन केली आहेत. यापैकी 12 पथके जिल्ह्यांतर्गत, तर 10 पथके जिल्ह्याबाहेर कार्यरत आहेत. जालना, बीड, धाराशिव, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांमध्येही आरोपींचा शोध घेतला जात आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरून 77 आरोपींना, तर गुजरात राज्यातून 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण 85 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. याशिवाय 5 पाहिजे आरोपी मयत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत कोकणे हे मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून काम पाहत असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत हे समन्वयाची जबाबदारी सांभाळत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांकडून गोपनीय माहिती संकलन, पडताळणी तसेच स्थानिक पोलीस यंत्रणांशी समन्वय साधून शोधकार्य सुरू आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध लागेपर्यंत ही विशेष मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

No Comment! Be the first one.