मच्छिंद्रनाथ चिंचोलीतील पाच गुणवंतांचा जाहीर सत्कार; जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत गाठले यशाचे शिखर
लोकार्थ प्रतिनिधी अविनाश घोगरे
घनसावंगी : ग्रामीण भागात शिक्षणाच्या मर्यादित सुविधा, प्रतिकूल परिस्थिती आणि संघर्षावर मात करीत जिद्द व मेहनतीच्या बळावर यश संपादन करता येते, हे मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील पाच गुणवंतांनी सिद्ध केले आहे. अधिकारी, डॉक्टर आणि महाराष्ट्र सुरक्षा दलात स्थान मिळवून गावाचा नावलौकिक वाढविणाऱ्या या विद्यार्थ्यांचा समस्त गावकरी मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, या सर्वांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले असून, त्यांच्या यशामुळे ग्रामीण शिक्षणाचा अभिमान उंचावला आहे.
या सोहळ्यात मोहन दामोधर मुळक (सहाय्यक कर अधिकारी), वैष्णवी सुभाष घोगरे (डॉक्टर), ऋषिकेश प्रकाश हेमके (एमबीबीएस डॉक्टर), प्रदीप गोरख थोरात आणि वैभव गोरख थोरात (महाराष्ट्र सुरक्षा दल) यांचा गौरव करण्यात आला. कोणत्याही खासगी शिकवणीचा आधार न घेता स्वकर्तृत्व, जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी मिळविलेले यश गावातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
१२ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत मधुकर मुळे यांनी उपक्रमाची संकल्पना आणि त्यामागील प्रेरणादायी भूमिका स्पष्ट केली. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक विचारांची रुजवण होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते, असे त्यांनी सांगितले. अशोक घोगरे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा, नियोजन आणि उद्देश विशद केला. तर अरविंद घोगरे यांनी बदलत्या काळात गुणवंतांचा सन्मान करण्याची आवश्यकता अधोरेखित करीत अशा उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
कर्तृत्वातूनच मिळतो खरा सन्मान!
शाहीर अरविंद घोगरे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. मान-सन्मान मागून मिळत नसतो, तर तो आपल्या कर्तृत्वातून निर्माण करावा लागतो. आज हे पाच विद्यार्थी गावकऱ्यांसमोर सन्मानाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन पुढील वर्षी याच खुर्चीवर बसण्याचे स्वप्न गावातील इतर विद्यार्थ्यांनी पाहावे आणि त्या दिशेने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन मोठे यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी गावाने एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पीएसआय विध्वंस यांचे मोलाचे सहकार्य
या सत्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी येणारा संपूर्ण खर्च पीएसआय प्रसाद विध्वंस यांनी उचलला. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व्हावा, त्यांच्या यशाला प्रोत्साहन मिळावे आणि इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण व्हावा, या उदात्त भावनेतून त्यांनी दिलेले आर्थिक सहकार्य विशेष कौतुकास्पद ठरले.
कार्यक्रमासाठी बंडूभाऊ रणमळे, विठ्ठल मुळक, रामभाऊ घोगरे, तुकाराम शिंदे, विलास काळे, मनोहर गाढे, नामदेव टोळे, हनुमंत पवार, उमेश खोसे, निलेश रणमळे, पंडित पराडे यांच्यासह आरती मंडळाचे सहकार्य लाभले. कैलास महाराज हेमके यांनी उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातही अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याचे आश्वासन दिले. विलास मुळक यांनी आभार मानले. कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून अधिकारी, डॉक्टर आणि महाराष्ट्र सुरक्षा दलापर्यंत मजल मारणाऱ्या या पाच गुणवंतांचा सन्मान केवळ व्यक्तींचा गौरव नसून ग्रामीण शिक्षणाच्या गुणवत्तेचा आणि गावाच्या एकजुटीचा गौरव ठरला आहे.
No Comment! Be the first one.