मटका, जुगार, ऑनलाइन जुगार अन् गौण खनिज तस्करी तातडीने बंद करण्याचे आदेश; ठाणेप्रमुखांना कारवाईचा इशारा
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील मटका, जुगार, ऑनलाइन जुगार तसेच अवैध गौण खनिज वाहतुकीसह इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करण्याचे कडक आदेश त्यांनी संबंधित ठाणेप्रमुखांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या या आदेशानंतर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेषतः पैठण, पाचोड आणि बिडकीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांवर आता पोलिसांकडून लक्ष केंद्रित केले जात असल्याचे चित्र आहे. कारवाईची कुणकुण लागताच काही ठिकाणी अवैध धंदे बंद करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून येईल, त्या ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही पोलीस अधीक्षक जाधव यांनी दिल्याचे समजते.
या आदेशामुळे अनेक दिवसांपासून एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले काही प्रभारी अधिकारी आणि बीट जमादार यांच्यात अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता लक्षात घेता काही अधिकारी व कर्मचारी बदली करून घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आता पोलीस अधीक्षकांच्या या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते, अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन होते का आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर खरोखर कारवाई होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.