लोकार्थ प्रतिनिधी गोपाल सातपुते
हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सभेच्या वतीने कार्यकर्त्यांनी छातीवर लावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष बिल्ल्याचे अनावरण पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उत्साहात संपन्न झाले.
यावेळी किसान सभेचे राज्य पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्या. त्या म्हणाल्या की, स्वर्गीय अजितदादांचे आवडीचे वाक्य होते, ‘मी कामाचा माणूस आहे.’ किसान सभेने हेच वाक्य आपले ब्रीदवाक्य मानून शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात आणि अडीअडचणींच्या काळात सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहावे.
राज्यातील युती सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. या निर्णयांची आणि शासनाच्या योजनांची माहिती राज्यातील शेवटच्या घटकातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचवून त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे ही किसान सभेची प्रमुख जबाबदारी आहे. हे काम निष्ठेने, तत्परतेने आणि सेवाभावी वृत्तीने केले पाहिजे. तरच स्वर्गीय अजितदादांच्या विचारांना आणि छातीवरील या बिल्ल्याला खऱ्या अर्थाने न्याय दिल्यासारखे होईल, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, आमदार संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा फ्रंटल प्रमुख लतीफभाई तांबोळी, किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. वसंतराव मनकर, राज्य संघटक डॉ. मंगेश देशमुख, राज्य सरचिटणीस डॉ. गणेश डोंगरे, राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ विभागप्रमुख जगदीशभाई जूनगरी यांच्यासह राज्यभरातील किसान सभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी यांनी केले.
No Comment! Be the first one.