लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू कन्नड
ज्ञान मिळवण्यासाठी जिज्ञासा आणि बौद्धिक क्षमता आवश्यक असते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना नवनवीन पुस्तकं वाचण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी विविध उपक्रम राबवणं महत्त्वाचं आहे. बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय सातत्याने हे काम करत आहे. असं मत प्रसिद्ध लेखिका आणि सेवानिवृत्त प्राचार्या छाया महाजन यांनी व्यक्त केलं.
लोकनेते सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयात आयोजित ‘वाचू आनंदे’ पुस्तकपेटी उपक्रमाचा शुभारंभ छाया महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, रीड अँड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी, जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे, सीमा मेहेत्रे आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेंद्र पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी रीड अँड लीड फाउंडेशनच्या वतीने मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांनी घाट शेंद्रा येथील उर्दू शाळेला १०० उर्दू पुस्तकांची पुस्तकपेटी भेट दिली. प्रत्येक पुस्तकपेटीत १०० पुस्तकांचा समावेश होता. ग्रामीण भागातील १२ गावांमधील जिल्हा परिषद शाळांनाही पुस्तकपेट्या देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी म्हणाले, “विद्यार्थ्यांनो आणि माझ्या मित्रांनो, पुस्तकांना आपलं मित्र बनवा, जग तुम्हाला मित्र बनवेल. तुम्ही पुस्तकांसाठी वेळ द्या, लोक तुमच्यासाठी वेळ देतील. पुस्तकापेक्षा चांगला मित्र जगात दुसरा नाही. आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम पुस्तकंच करतात.”
ते पुढे म्हणाले, “आज मी या वाचनालयाला भेट दिली. माझ्या हस्तेही काही पुस्तकं देण्यात आली. हे वाचनालय पाहून मला खूप आनंद झाला. माझा हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.”
यावेळी त्यांनी ‘मरियम मिर्झा मोहल्ला बाल वाचनालय’ अभियानाचा उल्लेख केला. सहावीत शिकत असताना मरियम मिर्झा हिने मुलांसाठी पहिलं मोहल्ला वाचनालय सुरू केलं आणि अवघ्या एका वर्षात २५ वाचनालयं सुरू केली, अशी माहिती त्यांनी दिली. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ४२, परभणीत १५, हैदराबादमध्ये ५ आणि बुरहानपूरमध्ये ५ वाचनालयं सुरू आहेत. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी मुलांना भरभरून सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. यापुढेही नियमित येऊन मुलांशी संवाद साधत राहू, असं त्यांनी सांगितलं.
ग्रामीण भागातील मुलांना आणि विद्यार्थ्यांना वाचनाची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून तो सातत्याने सुरू राहायला हवा, अशी अपेक्षा उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे यांनी व्यक्त केली.
भावी पिढी घडवण्याचं महत्त्वपूर्ण काम हे वाचनालय करत आहे. सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांनी आपल्या कार्यातून जनहिताचे अनेक आदर्श निर्माण केले. अत्यंत कमी खर्चात या वाचनालयात सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीने या वाचनालयाचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील यांनी केलं.
कार्यक्रमाला श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव चंद्रकांत देशमुख, डॉ. आनंदराव महाले, प्राचार्य डॉ. विजय भोसले, वाचनालयाचे रामकृष्ण पवार, मुख्याध्यापिका सुनीता दळवी, कौतिकराव पवार, रामकृष्ण तुपे, प्रा. अंबादास सगट, प्रा. हुकूमचंद पवार, प्रा. शिवाजी हुसे, प्रा. अशोक भोसीकर, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि पुस्तकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नरेश सोनवणे यांनी प्रास्ताविक केलं. संजय त्रिभुवन यांनी सूत्रसंचालन केलं आणि उपस्थितांचे आभार मानले.
No Comment! Be the first one.