राजू शेट्टींच्या आंदोलनाची पैठणमध्ये धग; शहागड फाट्यावर ऊस वाहतूक रोखून शेतकऱ्यांचा एल्गार
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
पैठण – ऊसाला प्रति टन ५ हजार रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या आंदोलनाची धग पैठणमध्येही पोहोचली आहे. शुक्रवारी शेतकऱ्यांनी शहागड फाट्यावरील चौकात ऊस वाहतूक रोखत श्रीफळ फोडून आंदोलनाला सुरुवात केली.
या आंदोलनाला शेतकऱ्यांसह छावा क्रांतिवीर सेना आणि छावा संघटनेने पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदवला. ‘ऊसाला भाव नाही, तर ऊसाची वाहतूक होऊ देणार नाही’ अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ऊसाचा भाव जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, भाव जाहीर न करताच साखर कारखाने सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासनाच्या या भूमिकेमुळे आपल्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला. पैठण शहरातील शहागड फाटा चौकात ऊस वाहतूक बंद केल्यामुळे कारखान्यांकडे जाणाऱ्या ऊस वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव मुळे, छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल पाटील राऊत, छावा संघटनेचे साईनाथ कर्डिले, शेतकरी नेते पवन सिसोदे, शिवाजी साबळे, सुभाष नवथर, पटेल, रामेश्वर बावणे यांच्यासह मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले.
ऊसाला योग्य भाव जाहीर होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला.
No Comment! Be the first one.