लोकार्थ रिपोर्ट सुजित शिंदे — धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाच कळंब शहरातून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे.
दोन एकरातील सोयाबीन काढून मळणीसाठी ठेवलेल्या ढिगाऱ्याला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने संपूर्ण सोयाबीन जळून राख झाले आहे
कळंब शहरातील नारायण फुन्ने या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह मोठ्या कष्टाने दोन एकरातील सोयाबीनची काढणी केली होती. दुष्काळाच्या परिस्थितीत जेमतेम उत्पन्न मिळेल, या आशेने त्यांनी सोयाबीन मळणीसाठी शेतात काढून ठेवले होते.
मात्र, सोयाबीनच्या मळणीसाठी मशीन येणार असतानाच पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने या ढिगाऱ्याला आग लावली. या आगीत संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले.
दुष्काळामुळे आधीच उत्पादनावर मोठा परिणाम झाला असताना, हातातोंडाशी आलेले पीक आगीत जळून गेल्याने शेतकरी कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे.
या घटनेप्रकरणी शेतकरी नारायण फुन्ने यांनी कळंब पोलिसांत तक्रार दाखल केली असून, आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बाईट: नारायण फुन्ने,शेतकरी
बाईट: महीला शेतकरी
दुष्काळाच्या संकटात मोठ्या कष्टाने उभे केलेले सोयाबीन पीक आगीत जळून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई कधी होते, याकडे शेतकरी कुटुंबाचे लक्ष लागले आहे.
No Comment! Be the first one.