पुर्णा तालुक्यातील गणपुर शिवारातील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद
लोकार्थ प्रतिनिधी सुशिल गायकवाड पुर्णा
परभणी शहरातील सरगम कॉलनीतून बेपत्ता झालेल्या ३९ वर्षीय महिलेचा मृतदेह पूर्णा तालुक्यातील गणपूर शिवारात कॅनॉलच्या पाण्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मीनाक्षी विजय घोडके (वय ३९, व्यवसाय नर्स, सरकारी दवाखाना पाथरी) या २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मसाला आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्या घरी परत न आल्याने त्यांचे पती विजय जोसेफ घोडके यांनी २६ नोव्हेंबर रोजी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १४०(३) अन्वये गुन्हा क्रमांक ८१८/२०२६ दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.५० वाजण्यापूर्वी पूर्णा तालुक्यातील गणपूर शिवारात गट क्रमांक १०१ च्या शेतालगत असलेल्या कॅनॉलमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. शेतकरी गोविंद जळबाजी काळबांडे यांनी मृतदेह दिसल्याची माहिती पूर्णा पोलिसांना दिली. मृत महिलेचे वय अंदाजे ३९ वर्षे, उंची पाच फूट तीन इंच, रंग गोरा असून अंगावर लाल रंगाचा पंजाबी ड्रेस व पायात काळ्या रंगाचे शूज होते.
माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास पडलवार, आनंद सोनकांबळे, पवन लांडगेवाड व लालबा पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताडकळस येथील दवाखान्यात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. तपासणी पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.
या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात ADR क्रमांक ४४/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पडलवार करीत आहेत.


No Comment! Be the first one.