उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे हिंगोली जिल्हा विकास समितीचे निवेदन; नवीन बासंबा बायपास परिसराची औद्योगिक क्षेत्रासाठी निवड
लोकार्थ प्रतिनिधी गोपाळ सातपुते
हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांचे वाढते स्थलांतर रोखून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी हिंगोली शहराच्या पूर्व दिशेला नवीन औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) उभारण्यात यावे, अशी मागणी हिंगोली जिल्हा विकास समितीच्या वतीने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. हिंगोली शहरात आयोजित उद्योग व गुंतवणूक परिषदेनिमित्त हे निवेदन सादर करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात लिगो (LIGO) प्रयोगशाळेचा प्रकल्प निर्माणाधीन आहे. या प्रयोगशाळेच्या ३० किलोमीटर हवाई परिघात मोठ्या आवाजाची व कंपन निर्माण करणाऱ्या उद्योगांवर निर्बंध असल्याने हिंगोली, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यांतील काही उद्योग आणि क्रशर उद्योगांचे स्थलांतर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लिंबाळा औद्योगिक क्षेत्रातील उर्वरित उद्योगांवरही संकट निर्माण झाले असून काही उद्योजकांनी पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे.
आधीच हिंगोली, औंढा व सेनगाव हे तालुके औद्योगिकदृष्ट्या मागासलेले आहेत. रोजगाराच्या मर्यादित संधी, उच्च शिक्षण संस्थांचा अभाव आणि शेतीवरील अवलंबित्व यामुळे जिल्ह्यातील हजारो युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर व इतर शहरांकडे स्थलांतर करावे लागत आहे. बेरोजगारीमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक व आर्थिक समस्यांवर उपाय म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होणे आवश्यक असल्याचे समितीने निवेदनात नमूद केले आहे.
यासाठी हिंगोली शहराच्या पूर्व दिशेला हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील नवीन बासंबा बायपास परिसरात नवीन एमआयडीसी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या औद्योगिक क्षेत्रामुळे लिगो प्रकल्पाच्या निर्बंधांमुळे प्रभावित होणाऱ्या उद्योगांना पर्यायी जागा उपलब्ध होईल आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
नवीन बासंबा बायपास परिसर औद्योगिक क्षेत्रासाठी अनुकूल
नवीन एमआयडीसीसाठी प्रस्तावित बासंबा बायपास परिसराचे अनेक तांत्रिक फायदे समितीने निदर्शनास आणून दिले आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अरावली औद्योगिक कॉरिडॉरशी संबंधित असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. औद्योगिक वापरासाठी आवश्यक पाण्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीने अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर इसापूर धरणाचे बॅकवॉटर, तर जवळच पीपळखुटा तलाव उपलब्ध आहे. तसेच सुमारे ५० किलोमीटर अंतरावर पुसद वीज वितरण केंद्र असून प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रापासून रेल्वे स्थानक अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे भविष्यात ड्रायपोर्ट उभारणीसाठीही हा परिसर उपयुक्त ठरू शकतो.
हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगारी, युवकांचे स्थलांतर आणि उद्योगांचे स्थलांतर या समस्या लक्षात घेऊन शासनाने नवीन एमआयडीसीच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा जिल्हा विकास समितीने व्यक्त केली आहे.
या निवेदनावर हिंगोली जिल्हा विकास समितीचे अध्यक्ष राकेश भट्ट यांच्यासह कल्याण देशमुख, सुनील पाठक, विजय गुंडेकर, प्रकाश इंगोले, नामदेव कापसे, सुधाकर वाढवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No Comment! Be the first one.