महसूल विभागाचे वाळूविरोधी पथक करतेय काय? पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईने महसूल यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे, पैठण
स्वार्थासाठी गोदावरी नदीची अक्षरशः चाळणी करणाऱ्या वाळू तस्करांविरोधात पैठण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील तुळजापूर (नावगाव) परिसरातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या विनाक्रमांकाच्या पाच हायवा वाहनांवर पोलिसांनी छापा टाकून तब्बल १ कोटी ५० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
केला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे एकीकडे वाळू तस्करांचे धाबे दणाणले असून दुसरीकडे महसूल विभागाच्या वाळूविरोधी पथकाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी रात्री पैठण तालुक्यातील तुळजापूर (नावगाव) येथील गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याची माहिती नागरिकांना मिळाली होती. महसूल विभागाचे वाळूविरोधी पथक या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत होता. अखेर नागरिकांनी या प्रकाराची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करून थेट पैठण पोलिसांना कळविली.
या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव, बीट जमादार राजेंद्र जिवडे, हवालदार संदीप पाटेकर व कृष्णा दुबाले यांच्या पथकाने तुळजापूर (नावगाव) येथील गोदावरी नदीपात्रात धाव घेतली. यावेळी नदीपात्रातून विनाक्रमांकाच्या हायवा वाहनांमध्ये वाळू भरून अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणात अख्तर अफसर शेख (रा. भांबेरी, ता. अंबड), रामेश्वर दत्ता पाचुंदे (रा. गुंडेवाडी, ता. अंबड), प्रवीण सिताराम बीळे (रा. मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर), समीर सुभाण शेख (रा. चन्नापुरी, ता. अंबड) व सलमान समीद पठाण (रा. पिंपळवाडी पिराची) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाळूने भरलेली पाच हायवा वाहने जप्त करून पैठण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
गोदावरीचे पात्र पोखरले जात असताना महसूल यंत्रणा गप्प का?
पैठण तालुक्यातील आयटीआयच्या पाठीमागील गोदावरी नदीपात्रासह वडवळी, दादेगाव, नायगाव, नावगाव, तुळजापूर, आवडे उंचगाव आणि हिरडपुरी आदी परिसरांतून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. असे असताना महसूल विभागाचे स्वतंत्र वाळूविरोधी पथक नेमके काय काम करते, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीवरून काही तासांत मोठी कारवाई करता येत असेल, तर महसूल विभागाच्या पथकाला हा अवैध व्यवसाय का दिसत नाही? महसूल विभागाच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वाळू तस्करांशी अर्थपूर्ण संबंध आहेत काय, अशा चर्चांनाही या घटनेनंतर उधाण आले आहे.
गोदावरी नदीपात्राचे होणारे नुकसान रोखण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पैठण महसूल विभागाच्या कामकाजाची सखोल चौकशी करून वाळू तस्करीविरोधात निष्क्रिय असलेल्या यंत्रणेवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
No Comment! Be the first one.