सहा महिन्यांपासून अधीक्षकपद रिक्त; अवैध दारू विक्रीला अभय की यंत्रणेचे दुर्लक्ष?
लोकार्थ प्रतिनिधी, गोपाल सातपुते हिंगोली
शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचा हिंगोली जिल्ह्यातील कारभार सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात कायमस्वरूपी अधीक्षक नसल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून, ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रीवरही प्रभावी नियंत्रण नसल्याचे चित्र समोर येत आहे. विशेष म्हणजे, महसूल वसुलीचे उद्दिष्टही मोठ्या प्रमाणात पिछाडीवर राहिल्याने विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात देशी दारूची ४९, तर बिअरबारची २०९ दुकाने असून, याशिवाय परमिट रूमही आहेत. या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. चालू आर्थिक वर्षासाठी मार्च अखेरपर्यंत ७ कोटी २७ लाख रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र, आर्थिक वर्षातील आठ महिने उलटूनही आतापर्यंत केवळ ८८ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे उर्वरित चार महिन्यांत तब्बल ६ कोटी ३९ लाख रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे मोठे आव्हान विभागासमोर उभे ठाकले आहे.
जुलैपासून अधीक्षकपद रिक्त; आठवड्यातून दोनच दिवस अधिकारी
उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षकपद जुलै महिन्यापासून रिक्त आहे. सुरुवातीला नांदेड येथील अधिकाऱ्यांकडे हिंगोलीचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यानंतर मागील काही महिन्यांपासून लातूर येथील अधिकाऱ्यांकडे हा पदभार सोपविण्यात आला आहे. मात्र, संबंधित अधिकारी आठवड्यातून केवळ दोन दिवस हिंगोलीत येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे उर्वरित दिवस कार्यालयाचा कारभार स्थानिक कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू असल्याचे चित्र आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियमित उपस्थिती नसल्याने प्रशासकीय कामकाज, कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण आणि क्षेत्रीय तपासणीवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे.
ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट
जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागांत विनापरवाना दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. अवैध दारू विक्री रोखणे, परवानाधारक दुकानांची नियमित तपासणी करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे ही उत्पादन शुल्क विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात या बाबतीत अपेक्षित कठोर कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
अवैध दारू विक्रीचा विषय समोर आल्यानंतर अनेकदा पोलिस विभागाकडे बोट दाखवले जाते. मात्र, उत्पादन शुल्क विभागाचीही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. स्वतंत्र यंत्रणा आणि कर्मचारी असतानाही अवैध दारू विक्रीवर प्रभावी नियंत्रण का मिळवता येत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
चार महिन्यांत ६.३९ कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान
मार्च २०२७ अखेरपर्यंत ७.२७ कोटी रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. मात्र, आठ महिन्यांत केवळ ८८ लाख रुपये जमा झाल्याने उर्वरित चार महिन्यांत ६.३९ कोटी रुपये वसूल करावे लागणार आहेत. एवढ्या कमी कालावधीत मोठे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विभागाला विशेष नियोजन आणि प्रभावी कार्यवाही करावी लागणार आहे. कायमस्वरूपी अधीक्षक नसताना या कामकाजाचा आढावा कोण घेत आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी?
हिंगोली जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सुरू झाल्यापासून काही कर्मचारी एकाच ठिकाणी दीर्घकाळ कार्यरत असल्याची चर्चा आहे. काही कर्मचारी ज्येष्ठता यादीतून नाव कमी होऊ नये म्हणून लगतच्या जिल्ह्यात एक-दोन वर्षे बदली करून घेतात आणि त्यानंतर पुन्हा हिंगोलीत नियुक्ती मिळवतात, असे आरोप केले जात आहेत. या प्रकारामागे नेमके कोणाचे अभय आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
एकाच कार्यालयात दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने काही कर्मचाऱ्यांच्या कामकाजात मनमानी होत असल्याचीही चर्चा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियमित नियंत्रण नसल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी होणार आणि त्यांच्या कामकाजाचे परीक्षण कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कायमस्वरूपी अधीक्षक नियुक्त करण्याची मागणी
कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या विभागाला कायमस्वरूपी अधिकारी मिळत नाही, ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रीवर प्रभावी नियंत्रण नाही आणि महसूल वसुलीचे उद्दिष्टही पिछाडीवर आहे. या सर्व बाबी गंभीर असून शासनाने हिंगोली जिल्ह्यात तातडीने कायमस्वरूपी अधीक्षक नियुक्त करावा. तसेच विभागाच्या कामकाजाचा सखोल आढावा घेऊन अवैध दारू विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवावी आणि दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

No Comment! Be the first one.