26 स्टॉलधारकांचा सहभाग; विविध गृहउद्योग उत्पादनांची आकर्षक मांडणी
लोकार्थ प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : दीपावली सणाचे औचित्य साधून गरवारे कम्युनिटी सेंटर, एन-7, बी-1, सिडको येथे आयोजित करण्यात आलेला भव्य गृहउद्योग प्रदर्शन व खरेदी-विक्री मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात अतिशय छान संपन्न झाला. या प्रदर्शनात एकूण 26 स्टॉलधारकांनी सहभाग नोंदविला. नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्याचे उद्घाटन गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक श्री. सुनील सुतवणे, महिला विभाग प्रमुख श्रीमती सुलभा जोशी आणि श्रीमती प्रणाली रांजणीकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
महिला उद्योजिकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणे तसेच गृहउद्योगांना व्यासपीठ मिळवून देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता.
प्रदर्शनामध्ये साड्या, महिला कपडे, दागिने, दिवाळी फराळ, खाद्यपदार्थ, दिवाळी सजावट साहित्य, वूलन रांगोळी, रांगोळी स्टिकर्स, आकर्षक दिवे, हर्बल सौंदर्यप्रसाधने, सेंद्रिय स्वच्छता उत्पादने अशा विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. सर्व स्टॉलधारकांनी आपल्या उत्पादनांची आकर्षक मांडणी केली होती. खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रमाकांत रौतल्ले, शिल्पा असवलीकर, जगदीश बेडवळ आणि वसंत वाणी यांनी विशेष पुढाकार घेतला.
यावेळी सहभागी स्टॉलधारकांनी त्यांना आपली उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी व विक्री करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल गरवारे कम्युनिटी सेंटरचे आभार मानले. तसेच भविष्यातही अशा प्रकारच्या प्रदर्शन व खरेदी-विक्री मेळाव्यांचे आयोजन करून संधी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली.
गरवारे कम्युनिटी सेंटरच्या या उपक्रमामुळे स्थानिक महिला उद्योजिकांना प्रोत्साहन मिळाले असून, गृहउद्योगांना चालना देण्याच्या दृष्टीने हा मेळावा यशस्वी ठरला. सर्व स्टॉलधारक, ग्राहक आणि सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे गरवारे कम्युनिटी सेंटरतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
No Comment! Be the first one.