विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : गोवंश तस्करी, अवैध कत्तलखाने आणि गोमांस तस्करीविरोधात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. जानेवारी 2026 ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत पोलिसांनी 150 गुन्हे दाखल करून 300 आरोपींवर कारवाई केली. या कारवाईत 798 गोवंश जनावरांची सुटका, 24 हजार 264 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून 114 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. एकूण 5 कोटी 59 लाख 22 हजार 715 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, 11 सप्टेंबर रोजी खुलताबाद पोलिसांनी माटरगाव येथे अवैध गोवंश कत्तलखान्यावर छापा टाकून 42 जिवंत आणि पाच कत्तल केलेले असे 47 गोवंश, तसेच चार वाहने जप्त केली. या कारवाईत 42 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अजिम बाबू शेख, मोईन रज्जाक कुरेशी, अनिस अजिज कुरेशी आणि वाजीद अजिज कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाच्या देखरेखीखाली अवैध कत्तलखान्याचा भाग पाडून उद्ध्वस्त करण्यात आला.
तसेच 9 सप्टेंबर रोजी सिल्लोड शहर पोलिसांनी ईदगाहनगर परिसरात नाकाबंदी करून गोवंशाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला. त्यातून 28 बैलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत कंटेनरसह 34 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक शेख शगिर शेख शब्बीर याला ताब्यात घेण्यात आले असून अन्य दोन आरोपी फरार आहेत.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू असून गोवंश तस्करी, अवैध कत्तल आणि प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
No Comment! Be the first one.