जायकवाडी कालवा समिती बैठक निर्णय पहिली पाणीपाळी 5 नोव्हेंबरपासून
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जायकवाडी धरणाच्या पैठण उजव्या कालव्याच्या सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीत रब्बी हंगामासाठी चार आणि उन्हाळी हंगामासाठी दोन पाणी आवर्तनांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने देण्याची मागणी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी मान्य केली आहे. पहिली पाणीपाळी येत्या 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीपात्रातील सर्व बॅरेजेस एप्रिल महिन्यात पाण्याने भरून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. पिण्याच्या पाण्यासाठी बॅरेजमध्ये पाणी सोडण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
सध्या जायकवाडी धरणात 74 टक्के म्हणजेच सुमारे 58 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, या पाण्याच्या नियोजनबद्ध वापराबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीला खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास बापू भुमरे यांच्यासह विविध तालुक्याचे आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No Comment! Be the first one.