कटरने कुलूप आणि दरवाजांच्या कड्या तोडल्या; सोन्या-चांदीचे दागिने, रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : शहरातील तिसगाव येथील म्हाडा कॉलनीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल सहा फ्लॅट फोडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राज स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमध्ये घडलेल्या या सामूहिक घरफोडीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरट्यांनी सोसायटीच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. त्यानंतर कटरच्या साहाय्याने बंद फ्लॅटची कुलपे आणि दरवाजांच्या कड्या तोडून घरातील ऐवज लंपास केला. एका फ्लॅटमधून सोन्याचे कानातले आणि तीन हजार रुपये, तर दुसऱ्या फ्लॅटमधून मुलांच्या बचतपेटीतील पाच ते सहा हजार रुपये आणि चांदीच्या अंगठ्या चोरून नेल्या. उर्वरित चार फ्लॅटमधील चोरीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
विशेष म्हणजे, चोरट्यांची ही संपूर्ण हालचाल अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
No Comment! Be the first one.