लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
२१ जणांना पोलिसांची दिवाळी भेट! चोरीचे आणि हरवलेले २१ मोबाईल शोधून मूळ मालकांना परत ३ लाख ४० हजारांचे मोबाईल हस्तगत; वेदांतनगर पोलिसांची कामगिरी छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेदांतनगर पोलिसांनी २१ जणांना अनोखी भेट दिली आहे. गेल्या पाच महिन्यांत चोरीस गेलेले आणि हरवलेले तब्बल ३ लाख ४० हजार रुपये किमतीचे २१ मोबाईल फोन पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे शोधून काढत मूळ मालकांना परत केले. वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी व हरवल्याच्या विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींचा तपास करण्यासाठी पोलिस निरीक्षक एम. के. पालवे यांनी सायबर डेस्कचे पोलिस हवालदार एस. डी. होडशिळ यांच्या मदतीने केंद्र सरकारच्या CEIR पोर्टलवर तांत्रिक विश्लेषण केले. या तपासातून छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध जिल्हे आणि परराज्यांतूनही मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले. हस्तगत करण्यात आलेले २१ मोबाईल फोन पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या हस्ते मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. ऐन दिवाळीत हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांसाठी ही भेट आनंददायी ठरली. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर आणि सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.

No Comment! Be the first one.