पूर्णा नदीपात्राच्या काठावर सापडला मृतदेह; संसर्गजन्य आजारामुळे मृत्यूचा प्राथमिक अंदाज
लोकार्थ प्रतिनिधी गोपाल सातपुते
हिंगोली |सेनगाव तालुक्यातील मौजे लिंगा शिवारात पूर्णा नदीपात्राच्या काठावर अंदाजे सहा ते सात वर्षे वयाचा नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वन्यजीवप्रेमी आणि नागरिकांमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, ता ८ रोजी रविवारी सायंकाळच्या सुमारास काही स्थानिक नागरिक नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी पूर्णा नदीकाठच्या परिसरात गेले होते. यावेळी त्यांच्या निदर्शनास मृत बिबट्या आढळुन आला. नागरिकांनी तत्काळ याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने कोणतीही वेळ वाया न घालवता तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळाची पाहणी करून वनविभातर्फे रीतसर पंचनामा व कागदपत्रांच्या नोंदी पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर रात्री उशिरा मृत बिबट्याला ताब्यात घेत शासकीय वाहनाद्वारे सेनगाव येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले.
ता ९ सोमवारी श्रेणी-१ च्या पशुवैद्यकीय अधिकारी पथकाकडून नियमानुसार मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक निरीक्षणानुसार, मृत बिबट्या नर असून त्याचे वय सुमारे ६ ते ७ वर्षे आहे. प्रथमदर्शनी या बिबट्याचा मृत्यू एखाद्या संसर्गजन्य आजारामुळे झाला असावा, असा दाट संशय व अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बिबट्याचा देह व नैसर्गिक अवयव नियमांचे पालन करत जाळून नष्ट करण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई हिंगोलीचे विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक एस. आर. माने, वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एस. केंद्रे, मानद वन्यजीवरक्षक डॉ. श्रीधर कंदी, पशुवैद्यकीय अधिकारी एस. बी. देवकर, एस. एस. पठाडे, एस. एम. बुखारी, ग्राम महसूल अधिकारी डी. ए. कापसे, लिंगदरीच्या पोलीस पाटील रविता राठोड, ग्रामसेवक भगवान जाधव यांच्यासह वनपाल पी. टी. केंदळे आणि वनरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय परिसरातील अनेक ग्रामस्थ व नागरिकही घटनास्थळी उपस्थित होते.
निसर्गसाखळीत वन्यजीव अत्यंत महत्त्वाचे घटक असून त्यांच्या संरक्षणासाठी वनविभाग कटिबद्ध आहे. या प्रकरणी वनविभागाकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
No Comment! Be the first one.