पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन दिला धीर; पोलीस संरक्षण देण्याचीही मागणी
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर येथील रोहित पठारे खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यासाठी पक्षाच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत पाठपुरावा करण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने रोहित पठारे यांच्या आई-वडील आणि पत्नीची भेट घेऊन सांत्वन केले. संपूर्ण घटनाक्रम जाणून घेत कुटुंबीयांना धीर दिला. हा विषय ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला असून, पक्ष कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे आश्वासन देण्यात आले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप सापडले नसल्याने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. स्थानिक पोलीस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक भागवत फुंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता भेट होऊ शकली नाही. त्यामुळे लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे.
दरम्यान, वैजापूर पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांची भेट घेऊन पीडित कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. कुटुंबीयांनी भीती व्यक्त केल्यानंतर संरक्षण देण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.
यावेळी रूपचंद गाडेकर, सतीश गायकवाड, सखाराम शिनगारे, अंकुश पठारे, अंजन साळवे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित.


No Comment! Be the first one.