शेतकरी आणि उद्योगांना पाणी मिळालेच पाहिजे; चंद्रकांत खैरे यांचे प्रतिपादन
लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरण अर्थात नाथसागरावर शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. विधिवत धार्मिक विधी पार पडले. यावेळी गोदामाईला साडीचोळी अर्पण करून श्रद्धापूर्वक पूजन करण्यात आले.
जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील शेती, पिण्याच्या पाण्याची गरज आणि औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचे जलस्रोत आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि पाणीवाटप हा महत्त्वाचा विषय आहे.
यावेळी बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नाथसागरातील पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर दिला. शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि उद्योगधंद्यांनाही त्यांच्या गरजेनुसार नियोजनबद्ध पद्धतीने पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे व पाण्याचा गैरवापर नागरिकांना करू नये असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी व पिण्यासाठी यासह या पाण्यावर अवलंबून असणारे उद्योगधंदे या क्षेत्रांसाठी पाणी महत्त्वाचे असल्याने उपलब्ध जलसाठ्याचा वापर करताना योग्य नियोजन असणे आवश्यक आहे. नाथसागराच्या पाण्याचे व्यवस्थापन करताना विविध घटकांच्या गरजांचा विचार करण्याची भूमिका खैरे यांनी मांडली.
या जलपूजनप्रसंगी तालुकाप्रमुख मनोज पेरे, डॉ. सुनील शिंदे, नगरसेवक प्रतिनिधी योगेश धुपे, माजी नगरसेवक रमेश खांडेकर, संदीप लक्कडहार यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्ह्यातील महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. धरण प्रशासनाच्या वतीने गणेश कराडकर यांनी यावेळी उपस्थितांना धरणातील पाण्यासाठी ची माहिती दिली. नाथसागरावरील जलपूजनाच्या निमित्ताने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शेतकरी आणि उद्योगांसाठी पाण्याच्या योग्य नियोजनाची गरज अधोरेखित केली..
No Comment! Be the first one.