अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा वधू-वर मेळावा उत्साहात; वधू-वर पुस्तिकेचे प्रकाशन
लोकार्थ प्रतिनिधी विजय चौधरी
छत्रपती संभाजीनगर : ‘वैवाहिक जीवनात परस्पर विश्वास, समजूतदारपणा आणि एकमेकांना साथ देण्याची भावना महत्त्वाची असते. या मूल्यांच्या आधारावरच संसाराचा गाडा सुखाने पुढे जातो,’ असे मार्गदर्शन नाशिक येथील काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास यांनी केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने समर्थनगर येथील श्री समर्थ राम मंदिरात आयोजित वधू-वर मेळावा आणि वधू-वर पुस्तिका प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. रविवारी सकाळी ९.३० वाजता सुरू झालेल्या या मेळाव्यासाठी २१२ वधू आणि २७४ वरांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ५७ वधू आणि १५२ वर असे एकूण २०९ जण प्रत्यक्ष सहभागी झाले.
या कार्यक्रमाला महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, पुणे महिला सरचिटणीस वृषाली शेकदार, नगरसेविका श्वेता त्रिवेदी आणि सुमित त्रिवेदी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वधू-वर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. महंत सुधीरदास यांनी भावी वधू-वरांना वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्या आणि संसार यशस्वीपणे सांभाळण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मेळाव्यात दिलीप लाड आणि स्मिता नगरकर यांनी वधू-वरांची माहिती सादर केली. विवाहेच्छुकांना एकमेकांची माहिती जाणून घेण्यासाठी आणि योग्य जोडीदार निवडण्यासाठी या उपक्रमातून व्यासपीठ उपलब्ध झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू अदवंत यांनी केले, तर सुचेता पालोदकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वरिष्ठ सल्लागार दीपक कुलकर्णी, गायत्री, न्यायाधीश छाया खोचे, वैभव जोशी, कालिदास त्रिवेदी, सुभाष जोशी, मोहन काळे, संदीप बेदरकर, सुरेखा पारवेकर, अंजली पराडकर, गोविंद गालफाडे, निलेश जोशी, किरण शर्मा यांच्यासह महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
No Comment! Be the first one.