स्थानिक गुन्हे शाखेची पाथरी टोलनाक्यावर कारवाई; कासव वनविभागाच्या ताब्यात
विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : प्रतिबंधित दुर्मीळ कासवाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (१३ सप्टेंबर) शिताफीने ताब्यात घेतले. छत्रपती संभाजीनगर-सिल्लोड मार्गावरील पाथरी टोलनाक्यावर ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने पाथरी टोलनाक्यावर सापळा रचला. संशयित ईरटिका वाहन (एमएच ०५ ईए ५२४८) अडवून झडती घेतली असता पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बरणीत जिवंत कासव आढळून आले. त्याबाबत कोणताही परवाना किंवा कागदपत्रे आरोपींकडे नव्हती.
वनविभागाने केलेल्या तपासणीत कासवाची प्रजाती प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट झाले. पैशाचा पाऊस व गुप्त धनाच्या समजुतीतून कासवाची तस्करी केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
या प्रकरणी अख्तर खान शामिन खान पठाण (५२, सुरत), शेख अब्रार अहमद शेख (३१), साबीर खान अहमद खान मेवाती (४५), शेख मुख्तार शेख शहाबुद्दीन (३४) आणि सय्यद अब्रार अली रोशन अली (३४, सर्व जळगाव जिल्हा) यांना ताब्यात घेण्यात आले. वडोदबाजार पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, कासव कुठून आणले आणि तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

No Comment! Be the first one.