जिल्हा परिषद सदस्या वैजयंती वाल्मिक शिरसाठ यांच्या पाहणीनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर : तालुक्यातील भेंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अनधिकृत गैरहजेरीची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्य विभागाने संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच गैरहजर कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीसह विभागीय चौकशीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरेकर यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आदेशाद्वारे दिले आहेत.
जिल्हा परिषद सदस्या सौ. वैजयंती वाल्मिक शिरसाठ यांनी भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान उपस्थिती नोंदीनुसार केंद्रातील आठ कर्मचाऱ्यांपैकी केवळ दोन कर्मचारी उपस्थित असल्याचे, तर वैद्यकीय अधिकारीही मुख्यालयात अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्याचा उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे अपेक्षित असताना कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत असल्याचेही आदेशात नमूद आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित प्रकरण गंभीरतेने घेतले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना गैरहजेरी आणि कामकाजातील त्रुटींबाबत खुलासा मागविला असून, नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. गैरहजर कालावधीसाठी नियमानुसार ‘विनावेतन’ (No Work No Pay) करण्याची कार्यवाही तसेच अनधिकृत गैरहजेरीची नोंद सेवा पुस्तकात घेण्याबाबतही आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर परिणाम करणारी कारवाई करण्याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीचा प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी, गंगापूर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा करावा, तसेच कारवाईचा अहवाल आठ दिवसांच्या आत सादर करावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.
ग्रामीण आरोग्यसेवेतील निष्काळजीपणावर प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे भेंडाळा परिसरातील आरोग्यसेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
No Comment! Be the first one.