मुंबईतील लोकल प्रवाशांच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. पश्चिम रेल्वेच्या खोळंब्यानंतर आता मध्य रेल्वेच्या (Central Railway) लोकल वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकात सोमवारी एक मोठी दुर्घटना टळली असली, तरी या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक प्रचंड विस्कळीत झाली आहे.
ओव्हरहेड वायरवर पडले बांधकामाचे साहित्य
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचे साहित्य थेट चालत्या लोकलच्या ओव्हरहेड वायरवर (Overhead Wire) जाऊन पडले. साहित्याचा वायरशी संपर्क येताच मोठा स्फोट होऊन वायरला आग लागली. अवघ्या काही मिनिटांत परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले, ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
धीम्या मार्गावरील गाड्या ठप्प
या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या धीम्या (Slow Line) मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली. सुरक्षेचा उपाय म्हणून अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील गाड्या काही काळासाठी ठप्प करण्यात आल्या होत्या.
हजारो प्रवाशांचा खोळंबा
या अनपेक्षित बिघाडामुळे ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) च्या दिशेने प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. आठवड्याच्या सुरुवातीलाच लोकलची सेवा विस्कळीत झाल्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती.