शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख गजानन हेंबाडे पाटील यांचे धाडस; परिसरातून कौतुकाचा वर्षाव
लोकार्थ प्रतिनिधी गौतम बचुटे
हिंगोली : संकटाच्या प्रसंगी मदतीसाठी धावून जाणे हीच खरी माणुसकी असल्याचा प्रत्यय हिंगोली जिल्ह्यातील माळशेलू परिसरात आला. विहिरीत पडलेल्या दहा वर्षीय चिमुकलीला स्वतःचा जीव धोक्यात घालून सुखरूप बाहेर काढत शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख गजानन हेंबाडे (पाटील) यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.
मिळालेल्या माहितीनुसार, माळशेलू परिसरात शेतमजुरी करणाऱ्या संजय पवार यांची दहा वर्षीय मुलगी वैष्णवी ही पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली होती. पाणी भरत असताना अचानक तिचा तोल गेल्याने ती खोल विहिरीत पडली. ही घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. मुलगी विहिरीत पडल्याचे पाहून आई-वडिलांनी मदतीसाठी आक्रोश केला.
याचवेळी हिंगोलीवरून आपल्या गावाकडे जात असलेले शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख गजानन हेंबाडे पाटील हे त्या मार्गाने जात होते. विहिरीजवळील आरडाओरड आणि गोंधळ पाहून त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता त्यांनी खोल विहिरीत उडी घेतली आणि वैष्णवीला सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे चिमुकलीचे प्राण वाचले.
आपली मुलगी सुखरूप बाहेर आल्याचे पाहताच वैष्णवीच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले. “हेंबाडे पाटील देवासारखे धावून आले आणि त्यांनी आमच्या लेकीचा जीव वाचवला,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी गजानन हेंबाडे पाटील यांचे आभार मानले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचाराची प्रचीती या घटनेतून आल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. हेंबाडे पाटील यांच्या धाडसाचे आणि समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून जाणे हीच खरी माणुसकी, हे गजानन हेंबाडे पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

No Comment! Be the first one.