लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सातारा परिसरातील ६० वर्षीय व्यावसायिकाची तब्बल १७ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिशानगरी, बीड बायपास रोड येथील दीपक श्रीनिकराव संघई यांनी याबाबत फिर्याद दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, ३१ जुलैपासून आरोपींनी ‘Bright Future-202’ आणि ‘VIP 169’ या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून संघई यांच्याशी संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीत मोठा नफा मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला.
यानंतर आरोपींनी एका बनावट संकेतस्थळावर गुंतवणूक करण्यास सांगून संघई यांच्याकडून विविध माध्यमांतून १७ लाख रुपये घेतले. त्यानंतर आणखी ४२ लाख ८२ हजार रुपये भरण्याची मागणी करण्यात आली. ही रक्कम न भरल्यास आर्थिक दंड तसेच कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देण्यात आली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संघई यांनी २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवली. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संबंधित व्हॉट्सॲप क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि आर्थिक व्यवहारांच्या आधारे तपास सुरू केला आहे

No Comment! Be the first one.