विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारली
लोकार्थ प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर
शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्याचे मंत्री मा. अतुल सावे यांनी कन्नड तालुक्यातील शेतकरी कुटुंबीयांची बांधावर तसेच घरी जाऊन भेट घेतली. गव्हालीतांडा येथील विठ्ठल धुमा चव्हाण आणि धनगरवाडी येथील रामकृष्ण वाघचौरे यांची भेट घेऊन त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला व त्यांच्या परिस्थितीची आस्थेने विचारपूस केली.
यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी रामेश्वर वाघमारे यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊन मंत्री अतुल सावे यांनी त्यांचे सांत्वन केले. कुटुंबावर आलेल्या संकटाच्या काळात मुलांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च वैयक्तिकरित्या उचलण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तसेच दिवाळीनिमित्त कुटुंबीयांना फराळाचे वाटप करून त्यांच्या सणाच्या आनंदात सहभागी झाले.
यावेळी मुलांशी संवाद साधताना प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण थांबवू नका, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शिक्षण पूर्ण करून आपले भविष्य उज्ज्वल घडवा, असा प्रेरणादायी संदेश मंत्री अतुल सावे यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन माहिती घेणे, त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी समजून घेणे आणि गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करणे, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा दौरा करण्यात आला.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा परिषद सदस्य संजय गव्हाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर आबा पवार, जिल्हा परिषद सदस्य मंजुषाताई मलदोडे, किसान मोर्चा प्रदेश सचिव प्रकाश अण्णा घुले, जिल्हा सरचिटणीस सुभाष आबा काळे, राजेश बनकर पाटील मंडळ अध्यक्ष ललित सुराशे, माजी उपसभापती सुनील निकम, महेश मलदोडे, विलास भोजने, बाबासाहेब काळे, सुदाम पवार, गणेश चव्हाण, शशिकांत नागरे, विलास पवार, राजू भोजने, भरत जाधव, ज्ञानेश्वर काळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या पुढील पिढीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा मंत्री अतुल सावे यांचा हा पुढाकार सामाजिक संवेदनशीलता आणि जनसेवेचे उत्तम उदाहरण ठरला.






No Comment! Be the first one.