लोकार्थ प्रतिनिधी गौतम बचुटे, केज :-
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बनसारोळा ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. तत्कालीन सरपंच नीता धायगुडे आणि ग्रामसेवक मधुकर माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा काळे यांनी केली आहे.
२०१९ ते २०२२ या कालावधीत विकासकामांचा निधी प्रत्यक्ष कामांवर खर्च न करता खोटी बिले तयार करून आणि संबंधित व्यक्तींच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये वर्ग केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या व्यवहारांमध्ये सुमारे १ कोटी ८ लाख रुपयांचा निधी वळविल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.
२८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने चौकशीसंदर्भातील पत्रव्यवहार नोंदीवर घेतला असून, प्रकरणाची पुढील सुनावणी २ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.
आता या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीतून काय समोर येते आणि संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No Comment! Be the first one.