लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुले जालना
जालना तालुक्यातील वाघरूळ जहागीर येथे चार्जिंगवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक स्कुटीला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे जालना तालुकाध्यक्ष अनिरुद्ध पाचगे यांच्या स्कुटीला ही आग लागली असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध पाचगे यांनी रात्रीच्या वेळी स्कुटी चार्जिंगला लावली होती. त्यानंतर सकाळी त्यांनी स्कुटी घरासमोर उभी केली असताना अचानक वाहनाला आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने स्कुटीचे मोठे नुकसान झाले.
या घटनेबाबत अनिरुद्ध पाचगे यांनी माहिती देताना वाहनाच्या नुकसानीबद्दल सांगितले. तसेच इलेक्ट्रिक चार्जिंग स्कुटी खरेदी करण्याबाबत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, या आगीचे नेमके कारण काय, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

No Comment! Be the first one.