शिवना नदीपात्रातील मध्यरात्रीच्या हाणामारीने खळबळ; एक गंभीर जखमी, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड –
गंगापूर : गंगापूर तालुक्यातील सनव येथील शिवना नदीपात्रात अवैध वाळू उपशावरून दोन गटांत सुरू असलेल्या वादाला बुधवारी पहाटे रक्तरंजित वळण लागले. ७ ऑक्टोबर रोजी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास झालेल्या हाणामारीत डोक्यात अज्ञात हत्याराने वार झाल्याने रियाज पठाण (रा. सनव) यांचा मृत्यू झाला, तर अशद सत्तार शेख (रा. सनव) हा गंभीर जखमी झाला. या घटनेने सनव परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवना नदीपात्रात जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा करून डंपरमध्ये वाळू भरण्याचे काम सुरू होते. याचदरम्यान रियाज पठाण व अशद सत्तार शेख हे नदीपात्रात आले असता दुसऱ्या गटातील काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यात रियाज यांच्या डोक्यात अज्ञात हत्याराने जोरदार वार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अशद शेख यालाही मारहाण झाल्याने तो गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोरांपैकीही एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
वाहन पकडल्यावरून वादाची ठिणगी?
दरम्यान, चार ते पाच दिवसांपूर्वी रियाज यांचे वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले होते. तसेच रियाज यांनी रात्री पोलिसांना समोरील गटाच्या वाहनाबाबत माहिती दिल्याच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांमध्ये वाद सुरू असून, यापूर्वीही शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्याची माहिती आहे. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
पहाटेपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तळ
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी शेखर आणि शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी शेखर यांनी दिली.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या घटनेनंतर सनव गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेमुळे शिवना नदीपात्रातील अवैध वाळू उपशाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, वाळूच्या वादातून थेट खुनापर्यंत परिस्थिती पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

No Comment! Be the first one.