महालक्ष्मी चौकाजवळ २००० मिमी जलवाहिनीचा वॉल निखळला; पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्त्यावर पाण्याचा लोट
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न कायम असतानाच दुसरीकडे नव्या पाणीपुरवठा योजनेतून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. सिडको एन-२ परिसरातील महालक्ष्मी चौकाजवळ ही घटना घडली. दोन हजार मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे स्कोअरिंग सुरू असताना अचानक वॉल निखळल्याने मोठ्या दाबाने पाणी बाहेर पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीची तांत्रिक प्रक्रिया सुरू असताना हा प्रकार घडला. स्कोअरिंगचे काम सुरू असतानाच जलवाहिनीचा वॉल अचानक निखळला. त्यामुळे जलवाहिनीतून प्रचंड वेगाने पाणी बाहेर पडू लागले. काही वेळातच परिसरातील रस्त्यावर पाण्याचा मोठा लोट वाहू लागला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शहरात नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्याची प्रतीक्षा असताना नव्या योजनेच्या जलवाहिनीतून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने पाणीपुरवठा यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
No Comment! Be the first one.