लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : सैन्य दलासाठी राखीव मद्याचा गैरवापर करून त्याची बेकायदा विक्री करणाऱ्या निवृत्त सुभेदाराला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. बाजीराव श्यामराव सोनुने (रा. द्वारकानगर, पडेगाव) असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई सोमवारी (५ ऑक्टोबर) जालना रोडवरील सेव्हन हिल्सजवळील किया मोटर्ससमोर करण्यात आली.
सोनुने हा सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार असून, लष्करी कॅन्टीनमधून मद्य खरेदी करून परिचितांच्या माध्यमातून त्याची विक्री करत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. ग्राहकांना मद्याची होम डिलिव्हरीही केली जात असल्याचे समोर आले.
पथकाने सापळा रचून त्याला पकडले असता मोपेडच्या डिक्कीत आणि समोरील बॅगेत सहा सीलबंद मद्याच्या बाटल्या आढळल्या. त्यानंतर घराची झडती घेतली असता आणखी ५१ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. मद्याची किंमत १ लाख २ हजार ८८५ रुपये, तर मोपेडची किंमत ६० हजार रुपये असून, एकूण १ लाख ६२ हजार ३८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
No Comment! Be the first one.