आकाशवाणी ते उपाली बुद्धविहार अशी होणार चारिका
लोकार्थ प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : थायलंडचे भदन्त फ्रा अचान चालन यांच्या नेतृत्वाखालील सुमारे १२५ भिक्खूंचा संघ शनिवारी (दि. ७) पहाटे छत्रपती संभाजीनगरात दाखल होणार आहे. बोधगया येथील वर्षावास पूर्ण केल्यानंतर नागपुरातील दीक्षाभूमीला भेट देऊन हा संघ शहरात येत आहे. त्यांच्या आगमनानिमित्त बौद्ध उपासक-उपासकांकडून स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
चौका येथील लोकुत्तरा महाविहारातून सकाळी ९ वाजता भिक्खू संघ शहरात दाखल होईल. त्यानंतर सुमारे तीन ते चार किलोमीटर चारिका करण्यात येणार आहे. आकाशवाणी चौकात समता सैनिक दलाची तुकडी भिक्खू संघाला मानवंदना देईल. उपासक संघातर्फे भिक्खु संघाचे भव्य स्वागत होऊन चारिकेस प्रारंभ होईल. तेथून भानुदासनगर, त्रिमूर्ती चौक मार्गे बौद्धनगर येथील उपाली बुद्धविहारात उपासकांकडून भिक्खू संघाला भोजनदान दिले जाईल. भोजनदानानंतर धम्मदेसनेचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर उपासक व उपासिका संघाचे भोजनदान होईल. तेथून भिक्खू संघ वेरूळ येथील लेण्यांना भेट देऊन सायंकाळी लोकुत्तरा महाविहारात मुक्काम करेल.
रविवारी हा संघ अजिंठा लेण्यांना भेट देणार आहे. त्यानंतर लोकुत्तरा महाविहारात विश्रांती घेऊन सायंकाळी मुंबईकडे प्रयाण करेल. मुंबईतील गोराई, बोरिवली येथील पॅगोडाला भेट देऊन तेथे मुक्काम केला जाईल. सोमवारी, ९ नोव्हेंबर रोजी कान्हेरी लेणी किंवा नालासोपारा येथील स्तूपाला भेट दिल्यानंतर भिक्खू संघ मुंबई विमानतळाकडे रवाना होईल.
या चारिकेत शहरातील सर्व उपासक-उपासिकांनी शुभ्रवस्त्रे परिधान करून सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. भिक्खू संघाच्या स्वागतासाठी बौद्धनगर, उपाली महिला मंडळ, रमाई महिला मंडळ, बी. एस. फ्रेंड सर्कल आणि युवक उत्सव समितीसह विविध बुद्धविहार समित्यांचे पदाधिकारी पुढाकार घेत आहेत.
No Comment! Be the first one.