विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या गुन्हे शाखेने कारवाई करत २ लाख ५३ हजार ८७० रुपये किमतीचे ५१ ग्रॅम २९ मिलिग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त केले. ही कारवाई १७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गारखेडा परिसरातील गणेश कॉलनी, आयकॉन हॉस्पिटलजवळ करण्यात आली.
अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन जायभव, पोलिस उपनिरीक्षक उदयेश्वर मुंडे व त्यांच्या पथकातील अंमलदारांना वरिष्ठांच्या आदेशानुसार मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. नदीम शेख याच्याकडे विक्रीसाठी आणलेला एम.डी. ड्रग्जचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून कारवाई केली.
पोलिसांनी नदीम शेख याच्याकडून ५१ ग्रॅम २९ मिलिग्रॅम वजनाचा एम.डी. ड्रग्ज, ज्याची किंमत २ लाख ५३ हजार ८७० रुपये आहे, जप्त केला. चौकशीत त्याने हा ड्रग्ज जावेद इब्राहिम (रा. बांद्रा, मुंबई) याच्याकडून आणल्याचे पोलिसांना सांगितलें
या प्रकरणी नदीम शेख व जावेद इब्राहिम यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद आणि पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव पोलिस उपनिरीक्षक मुंडे तसेच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.

No Comment! Be the first one.