लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
रस्ता अडवून ट्रकचालकाशी वाद घालणाऱ्या दोघांनी कारवाईसाठी आलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. अतिरिक्त पोलीस कुमक बोलावल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही घटना मिल कॉर्नर परिसरातील साई रुग्णालयासमोर सोमवारी (२८ सप्टेंबर) पहाटे पावणेदोनच्या सुमारास घडली.
सईद जावेद पठाण (२३) आणि फैजल इब्राहिम पठाण (३३, दोघे रा. बेरीबाग, हसूल) अशी आरोपींची नावे आहेत. नियंत्रण कक्षाकडून रस्ता अडवून वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी दोघांनी दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी उभ्या करून ट्रक अडवला होता.
पोलिसांनी दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्यानंतर दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली. सईदने पोलीस अंमलदार नितीश काकड यांची कॉलर पकडून त्यांच्या दंडाला नखाने बोचकारले. तर फैजलने पोलीस अंमलदार शिंदे यांच्याशी झटापट करत मारहाण केली. त्यानंतर अतिरिक्त कुमक बोलावून दोघांना ताब्यात घेण्यात आले.
काकड यांच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर करीत आहेत.
No Comment! Be the first one.