अन्यथा पदवीधर निवडणुकीवर बहिष्कार – बेटमोगरेकर
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे नांदेड
मुखेड तालुक्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शासनाच्या Trigger-1 अंतर्गत जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून मुखेडला वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. मुखेडचा तातडीने Trigger-1 मध्ये समावेश करावा अन्यथा आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना निवेदन दिले आहे.
राज्य शासनाने खरीप २०२६ हंगामासाठी Trigger-1 अंतर्गत राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असून, नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी १४ तालुक्यांचा समावेश केला आहे. मात्र, मुखेड तालुक्याला वगळण्यात आले आहे. मुखेडमध्ये पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी उभी पिके करपून गेली आहेत.
अशा परिस्थितीत मुखेडला दुष्काळ जाहीर करणे आवश्यक होते. परंतु, पर्जन्यमानाच्या चुकीच्या निकषावर दुष्काळग्रस्तांच्या यादीतून मुखेडला वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. शेतकऱ्यांना न्याय हवा असून, आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे भेटून मुखेड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करून घ्यावा अशी विनंतीही त्यांनी केली.
या मागणीसाठी १ ऑक्टोबर रोजी मुखेडमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला नाही, तर जाहीर झालेल्या पदवीधर निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाईल. मुखेड तालुक्यातील कोणताही पदवीधर मतदार मतदान करणार नाही, अशी माहितीही बेटमोगरेकर यांनी यावेळी आमदार चव्हाण यांना दिली आहे. यावेळी शिवशंकर पाटील कलंबरकर यांचीही निवेदनावर स्वाक्षरी आहे.
No Comment! Be the first one.