भाविकांमध्ये संभ्रम, वेरूळच्या ग्रामस्थांचा कडाडून विरोध
लोकार्थ प्रतिनिधी विजय चौधरी
खुलताबाद
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकास कामांसाठी श्रीक्षेत्र वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर २० ऑक्टोबरपासून बंद राहणार असल्याची चर्चा सुरू असून यामुळे स्थानिक ग्रामस्थ व्यावसायिकांनी मंदिर बंद ठेवण्यासाठी कडाडून विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भाविक आणि नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून याबाबत भाविकांकडून घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कडे फोन कॉल्स आणि संदेशांचा मोठ्या प्रमाणात भडीमार सुरू आहे. मात्र आता मंदिर बंद राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले असून श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कुणाल लांडगे यांनी याबाबत स्पष्ट केले आहे की, मंदिर बंद ठेवण्याबाबत अद्याप तरी कोणत्याही प्रकारची अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. प्रशासनाकडून अधिकृत सूचना प्राप्त झाल्यानंतर भाविकांना याविषयी जाहीरपणे कळविण्यात येईल. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू असल्याची ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मंदिर बंद राहणार असल्याच्या चर्चामुळे भाविकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी. नागरिकांनी आणि भाविकांनी कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितींवर विश्वास ठेवू नये. तूर्त तरी घृष्णेश्वर मंदिर सुरू आहे. सध्या तरी घृष्णेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली. दरम्यान यापूर्वी देखील मंदिर बंद ठेवण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच घृष्णेश्वर मंदिराला चार दरवाजे असल्याने भाविकांच्या दर्शना बाबत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मंदिर बंद न ठेवता देवस्थान ट्रस्टने आवश्यक दक्षता घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र सध्याच्या घडीला मंदिर बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना नसल्याने भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांततेने आणि भक्ती भावाने श्री घृष्णेश्वराचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरातील विकास कामांसाठी २० ऑक्टोबर पासून बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याने वेरूळ येथील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पर्यटनाचा ऐन हंगाम नोव्हेंबर मध्ये सुरू होतो. आणि याच दरम्यान जर घृष्णेश्वर मंदिर बंद ठेवण्यात आले तर स्थानिक ग्रामस्थ, हॉटेल व्यवसायिक, लॉजिंग चालक, पर्यटन धार्मिक स्थळांवर पूजा साहित्य, प्रसाद विक्री करणारे विक्रेते तसेच पर्यटन व्यवसायावर अवलंबून रोजगार करणाऱ्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी येणार आहे.
- बैठकीत खडाजंगी –
घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्यातील विविध विकास कामे, वाहतूक व्यवस्था, भाविकांसाठी सुविधा, याबाबत महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेरूळ येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, तहसीलदार संतोष गुट्टे, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप कोलते यांच्यासह वेरूळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीत घृष्णेश्वर मंदिरासमोरील रस्ता भुयारी मार्गाच्या कामासाठी सहा महिन्यासाठी बंद ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होऊन चांगलीच खडाजंगी झाली. नोव्हेंबर मध्ये दिवाळी पर्यटनाचा हंगाम सुरू होत असताना घृष्णेश्वर मंदिर बंद करण्याचा घाट घातला जात आहे. वेरूळ घृष्णेश्वर मंदिरातून वेरूळ मार्ग खुलताबादकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत बैठकी चर्चा झाली. मंदिर बंद आणि प्रमुख रस्ते बंद जर झाले तर भाविक, पर्यटक, ग्रामस्थ व्यावसायिकांची मोठी गैरसोय निर्माण होऊ शकते. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनासमोर पर्यायी मार्गाचा प्रस्ताव मांडला. या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून भाविकांचे आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका दर्शविल्याने उपस्थित त्यांनी समाधान व्यक्त केले.
- गुन्हे दाखल करण्याचा इशारा –
मंदिर बंद करण्याच्या निर्णयावरून बैठक तापली असताना काही व्यवसायिकांनी प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेत जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांनी विरोध करणाऱ्या व्यवसायिकांना कठोर शब्दात इशारा देत विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात बाबत वक्तव्य केले. त्यामुळे बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घृष्णेश्वर मंदिर सहा महिने बंद ठेवण्याच्या मुद्द्यावर ग्रामस्थांनी तसेच स्थानिक व्यावसायिकांनी बैठकीतून बाहेर पडत निषेध व्यक्त केला.
या बैठकीत घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य कुणाल दांडगे, विश्वस्त मिलिंद शेवाळे, माजी सरपंच प्रकाश पाटील मिसाळ, गोपाळकृष्ण घरकीपाटी, मकरंद आपटे, शेख समसुद्दीन, सतीश लोखंडे, रमेश माळी, विजय राठोड, विजय भालेराव, गणेश हजारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No Comment! Be the first one.