लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे नांदेड
नांदेड (म नेता)
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुदखेड येथे धाड टाकून अवैध गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकास पकडले असून त्यांच्या जवळून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसे पकडले आहे.
स्थानिक गुन्हे शाखचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवि वाव्हुळे व त्यांचे पथक उपविभाग नांदेड ग्रामीण हद्दीत अवैध धंद्यांची माहिती काढून प्रतिबंधक कारवाईसाठी गस्त घालत होते. गस्त दरम्यान पोलीस पथकास गोपनीय बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, मुदखेड येथील उमरी रोडवरील संकल्प बार समोर एक इसम कमरेला बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगून उभा आहे. मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करुन दोन पंचांना सोबत घेऊन सायंकाळच्या सुमारास पथकाने संकल्प बार समोर अचानक छापा टाकून संशयित इसमाला शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता माधव बालाजी देशमुख (वय 27 वर्षे, व्यवसायः चालक, रा. कृष्णानगर, मुदखेड, ता. मुदखेड, जि. नांदेड) असे सांगीतले. पंचांसमक्ष नमुद इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोवलेले विनापरवाना गावठी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्तूल सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. सदर गावठी पिस्तूल बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना आरोपीहकडे नसल्याने पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सदर मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक बळीराम दासरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी माधव बालाजी देशमुख याच्याविरुद्ध मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुदखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरील कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे, पोलिस उपनिरीक्षक बळीराम दासरे, माधव केंद्रे व त्यांच्या पथकातील देविदास चव्हाण, मोतीराम पवार व सोनसळे यांनी केली आहे.
No Comment! Be the first one.