धनंजय लांबे
संपादक लोकार्थ मिडिया
एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. आज घेतलेलं सोनं उद्या कधीही खरेदी दरापेक्षा जास्त किमतीतच विकलं जातं, असा भारतीयांचा ठाम समज आहे. मात्र, सोन्यातली गुंतवणूक अनेक वेळा फायदेशीर ठरते. शेअर बाजारात दहा रुपयांचा शेअर दोन रुपयांवरही येऊ शकतो. सोन्याच्या बाबतीत मात्र अशी जोखीम मुळीच नाही….
गेल्या 26 वर्षांत सोन्यापेक्षा शेअर बाजारातल्या गुंतवणुकीनं गुंतवणूकदारांना जास्त फायदा मिळवून दिला आहे. अमेरिकेतल्या शेअर बाजाराच्या अभ्यासातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. जगभराच्या अर्थव्यवस्थेवर अमेरिकन शेअर बाजाराचा प्रभाव असतो. त्यामुळे भारतातही हा अभ्यास लागू आहे. सन 2000 ते 2010 दरम्यान सोन्याच्या गुंतवणुकीने तब्बल 12.80% परतावा दिला. मात्र, शेअर बाजारातल्या गुंतवणुकीनं उणे 0.9% असा परतावा या शतकाच्या पहिल्या दहा वर्षात दिला. त्यानंतर दुसऱ्या दशकात, 2010 ते 2020 मध्ये सोन्यानं अवघा दीड टक्का तर शेअर बाजारानं थेट 13.90 टक्क्यांचा परतावा दिला, असं या अभ्यासातून स्पष्ट झालं. पुढच्या सहा वर्षात, म्हणजे 2020 ते 2026 दरम्यान सोन्यानं 9.20 तर शेअर बाजारानं 11.20 टक्क्यांचा परतावा, म्हणजेच रिटर्न्स दिले. गेल्या 26 वर्षात सोन्यानं एकूण 8.20 टक्के तर शेअर बाजारानं गुंतवणूकदारांना 10.10% परतावा मिळवून दिला. अर्थात, कधी सोनं तर कधी शेअर मार्केट वरचढ ठरतं. त्यामुळे नेमकी गुंतवणूक कशात करावी, हे जास्त त्यानं ठरवावं. शेअर बाजारात तुम्ही कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करता, यावर बरंच काही अवलंबून असतं. त्यासाठी बराच अभ्यास करावा लागतो. म्हणून सोन्यातली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.
मग, तुम्ही सोन्यात गुंतवणूक करणार की शेअर बाजारात?
नक्की ठरवा.

No Comment! Be the first one.