लोकार्थ प्रतिनिधी
भारतीय गणितज्ञ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बंगळुरू येथील प्राध्यापक महेश काकडे यांना संख्या सिद्धांतातील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी २०२६ चा रामानुजन पुरस्कार जाहीर झाला आहे.
विकसनशील देशांतील युवा गणितज्ञांसाठी दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरेटिकल फिजिक्स (ICTP) आणि इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल युनियन (IMU) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान केला जातो.
वयाची ४५ वर्षे पूर्ण न झालेल्या आणि विकसनशील देशांमध्ये कार्यरत राहून गणिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन करणाऱ्या गणितज्ञांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. महेश काकडे यांनी बीजगणितीय संख्या सिद्धांतात (Algebraic Number Theory) केलेल्या मूलभूत संशोधनासाठी हा पुरस्कार मिळवला आहे. संख्या कशा प्रकारे वागतात आणि विविध गणितीय संरचना एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत, यासंबंधीच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उकल त्यांच्या संशोधनातून झाली आहे. महेश काकडे यांचा जन्म अकोला येथे १९८३ मध्ये झाला. त्यांच्या या यशाबद्दल अकोला आणि विदर्भात आनंद व्यक्त केला जातोय.
बीजगणितीय संख्या सिद्धांत म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचे तर संख्या सिद्धांत म्हणजे संख्या आणि त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास. बीजगणितीय संख्या सिद्धांत या अभ्यासाला आणखी पुढे नेताना संख्यांच्या मागे दडलेले नमुने आणि गणिती संरचना शोधतो. या संरचनांमुळे संख्या विशिष्ट पद्धतीने का वागतात, हे समजून घेण्यास मदत होते.
काकडे यांनी ग्रॉस-स्टार्क (Gross-Stark) आणि ब्रुमर-स्टार्क (Brumer-Stark) अनुमानांवरही महत्त्वपूर्ण काम केले आहे. अनेक वर्षांपासून न सुटलेल्या या गणिती संकल्पना संख्या सिद्धांतातील वरकरणी वेगवेगळ्या वाटणाऱ्या शाखांना एकमेकांशी जोडतात.
काकडे यांच्या संशोधनाचा संबंध हिल्बर्ट यांच्या १२व्या समस्येशीही आहे. जर्मन गणितज्ञ डेव्हिड हिल्बर्ट यांनी १९०० मध्ये मांडलेल्या गणितातील २३ प्रसिद्ध समस्यांपैकी ही एक आहे. व्यापक अर्थाने या समस्येत विविध गणितीय प्रणालींशी संबंधित महत्त्वाच्या संख्यांचे पद्धतशीरपणे वर्णन करता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काकडे यांच्या संशोधनामुळे संख्या, समीकरणे आणि गणिती संरचना यांच्यातील काही अतिशय गुंतागुंतीचे परस्परसंबंध समजून घेण्यास गणितज्ञांना मदत होत आहे.
भारतात शिक्षण, केंब्रिजमध्ये उच्च शिक्षण
महेश काकडे यांचा जन्म आणि शिक्षण भारतातच झाले. त्यांनी बंगळुरूच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये गणित विषयात पदवी घेतली. त्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात गेले. तिथे त्यांनी शुद्ध गणितात पदव्युत्तर पदवी आणि २००८ मध्ये पीएच.डी. पूर्ण केली.
यानंतर त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठ, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि किंग्ज कॉलेज लंडन येथे काम केले. २०१९ मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बंगळुरू येथे प्राध्यापक म्हणून प्रवेश केला.
यापूर्वीही अनेक प्रतिष्ठेचे सन्मान
रामानुजन पुरस्कारामुळे काकडे यांच्या सन्मानांच्या यादीत आणखी एका प्रतिष्ठेच्या पुरस्काराची भर पडली आहे. त्यांना २०२२ मध्ये गणितीय विज्ञानासाठी इन्फोसिस पुरस्कार मिळाला होता. तसेच इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ मॅथेमॅटिशियन्समध्ये त्यांना निमंत्रित वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. २०२३ मध्ये त्यांचा ‘एशियन सायंटिस्ट १००’ या यादीतही समावेश करण्यात आला होता.
रामानुजन पुरस्कार
२००५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या रामानुजन पुरस्काराअंतर्गत १० हजार डॉलरची रोख रक्कम दिली जाते. विकसनशील देशांमध्ये अनेक आव्हानात्मक परिस्थितीत राहूनही गणिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय आणि मूलभूत संशोधन करणाऱ्या गणितज्ञांच्या कार्याचा या पुरस्काराद्वारे गौरव केला जातो.
No Comment! Be the first one.