माळटेकडी पुलाखाली एलसीबीचा सापळा; दोन घरफोड्यांचा छडा, १.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड- घरफोडीत चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात माळटेकडी पुलाखाली थांबलेल्या १९ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सापळा रचून अटक केली. सय्यद शारेख सय्यद शाहजेब (वय १९, रा. रहमतनगर, देगलूर नाका, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि १८ हजार रुपये रोख, असा एकूण १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नांदेड शहर व परिसरातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ५ ऑक्टोबर रोजी एलसीबीचे पथक नूरी चौक परिसरात गस्त घालत असताना माळटेकडी पुलाखाली एक संशयित इसम चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती मिळाली.
माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम आढळून आली.
No Comment! Be the first one.