दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी
सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या धान्य चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासांत उघडकीस आणला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सागर सुंदर काळे (वय 20, रा. सेलू ) यास ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याने साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील तीन गुन्हे निष्पन्न झाले असून, आरोपीविरुद्ध यापूर्वी विविध पोलिस ठाण्यांत दहा गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान आरोपीकडून 49 हजार रुपये किमतीचे हळदीचे 10 कट्टे, 50 हजार 400 रुपये किमतीचे तुरीचे आठ कट्टे आणि 50 हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण 1 लाख 49 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेत अवघ्या 24 तासांत त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील फरार आरोपी ज्ञानेश्वर शंकर पवार (वय 25) आणि करण शाम पवार (वय 19, दोघेही रा. सेलू, जि. परभणी) यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक गणेश सवंडकर, पोलिस हवालदार मुकेश बुधवंत, विलास सातपुते, पांडुरंग तूपसुंदर, पोलिस शिपाई उमेश चव्हाण, चालक उत्तम हनवते आणि महारुद्र सपकाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.
No Comment! Be the first one.