लोकार्थ प्रतिनिधी चंद्रकांत आंबिलवादे
पैठण तालुक्यातील कडेठाण येथे बुधवारी मध्यरात्री महावितरणच्या विद्युत तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने इलेक्ट्रिकल्स आणि मोबाईल दुकानाला आग लागली. या आगीत दुकानातील साहित्य, मोबाईल हँडसेट आणि मोटारसायकल जळून खाक झाली. या घटनेत सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कडेठाण येथील युवराज बाळासाहेब निर्मळ यांच्या मालकीचे ‘महालक्ष्मी इलेक्ट्रिकल्स अँड मोबाईल शॉपी’ हे दुकान बुधवारी मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दिवसभर दुकानातील व्यवहार आटोपून निर्मळ रात्री दुकान बंद करून घरी गेले होते. पहाटे दुकानातून धूर आणि आग दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीत एलईडी टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल हँडसेट, कॉम्प्रेसर, मोटारसायकल, इलेक्ट्रिकल साहित्य आणि इतर किमती वस्तू जळून खाक झाल्या.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, बीट जमादार संजय चव्हाण, ग्रामविकास अधिकारी विष्णू शिंदे, तलाठी श्रीकांत गीते आणि लाईनमन जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
या आगीत नुकसान झालेल्या दुकानमालकाला महावितरण कंपनीने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी चेअरमन भारतराव तवार, सरपंच संभाजी तवार आणि उपसरपंच भूषण तवार यांनी केली आहे.
No Comment! Be the first one.