अवैध शस्त्रांची विक्री करणाऱ्या संशयिताला अटक; कदीम जालना पोलिसांची धडक कारवाई
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
जालना शहरात अवैध शस्त्रांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयिताला कदीम जालना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन पिस्तूल, गावठी कट्टे, खंजीर, १० जिवंत काडतुसे तसेच आयफोन कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध शस्त्र विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ७.२० वाजता पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विशाल कॉर्नर परिसरात एक संशयित व्यक्ती अवैध शस्त्रे घेऊन थांबला असून, तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहे.
या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलीस ठाण्याच्या पथकाला कारवाईसाठी रवाना करण्यात आले.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे विशाल कॉर्नर परिसरात सापळा रचला. रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन पिस्तूल, त्यांची मॅगझिन, जिवंत काडतुसे, गावठी कट्टे तसेच एक आयफोन कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला.
दीड लाखांचे पिस्तूल, गावठी कट्टे आणि काडतुसे जप्त
पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे दीड लाख रुपये किमतीचे एक ऑटोमॅटिक पिस्तूल, ५० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि अन्य शस्त्रांचा समावेश आहे. तसेच मोबाईल फोनची किंमत अंदाजे ५० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७२/२०२६ नुसार शस्त्र अधिनियमाच्या कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१)(३) च्या उल्लंघनासंदर्भात कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध शस्त्र विक्रीचे जाळे उघड होणार?
संबंधित संशयित हा जालना शहर व परिसरात अवैध शस्त्रांची विक्री करणारा प्रमुख आरोपी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या शस्त्रांचा पुरवठा कुठून होत होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
शहरातील अवैध शस्त्रांची विक्री आणि संभाव्य गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी कदीम जालना पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
No Comment! Be the first one.