पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे बँक अधिकाऱ्यांना निर्देश
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जवाटप, कर्ज पुनर्गठन तसेच कर्जमाफीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी भवन येथे जिल्ह्यातील बँकांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रमुख अधिकारी, शाखाधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. कर्जमाफीची प्रक्रिया झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळविताना तसेच कर्ज पुनर्गठन करताना बँक स्तरावर विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या.
परभणी जिल्ह्यात सुमारे १ लाख ६० हजार शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत असून, त्यापैकी ७९ हजार २१८ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर सुमारे ६७२ कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम बँक स्तरावर जमा झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरही टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना संबंधित बँकेने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक असून, चालू वर्षाच्या ‘स्केल ऑफ फायनान्स’नुसार पीक कर्ज देण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही
सध्या जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, अशा कठीण काळात शेतकऱ्यांच्या अडचणींकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे. बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटप, कर्ज पुनर्गठन, नवीन कर्ज तसेच इतर बँकिंग सुविधांसाठी सुलभ व पारदर्शक कार्यपद्धती उपलब्ध करून द्यावी. असेही त्यांनी स्पष्ट केले.
No Comment! Be the first one.